Tuesday, September 22, 2009

भारतमाता उवाच्

खालील पोस्टमधील पात्रे व घटना पूर्णत: काल्पनिक आहेत. त्यांचा जिवंत अथवा मृत व्यक्तिशी काहीही संबंध नाही. आढळल्यास तो योगायोग समजावा. धन्यवाद!

नमस्कार... खरं तर मी या लेखाला "मी भारतमाता बोलतेयं" असं शीर्षक देणार होते, पण कोणी काही बोलतय म्हणजे ती वायफ़ळ बडबड समजुन तिकडे दुर्लक्ष करण्याची तुमची खोड मी चांगलीच जाणुन आहे. "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय", "मी नथुराम गोडसे बोलतोय" या बाबतीत नाही का असचं झालं. (अरे हो... "मी बाबुराव बोलतोय" हे पाचगळ गाणं तर मी विसरलेच. असो, विषयांतर नको..)

गेल्या महिन्यात १५ ऑगस्ट ला स्वातंत्र्यदेवतेची मला स्पेशल व्हिजिट होती. तिच्या ६३व्या वाढदिवसा निमित्त माझ्यासारख्या जख्खड म्हातारीला घेऊन भारतभ्रमण करायची तिला लहर आली होती. मी म्हंटल बाई माझ्याच्याने काय हे होणार नाही, भारतभर हिंडण्यापेक्षा आपण एखाद्या शांत ठिकाणी जाऊया. स्वातंत्र्यदेवतेलादेखील हे पटलं. ती म्हणाली मग आपण पुण्यालाच जाऊया, सिनेमागृहात राष्ट्रगीत गाण्याची प्रथा म्हणे पुण्यातुनच सुरु झालीय.

ठरल्याप्रमाणे दोघी पहाटे लवकर उठुन तयार झालो. निघण्यापुर्वी स्वातंत्र्यदेवतेला तिच बर्थडे गिफ्ट दिलं.."काय आहे गं हे?", स्वातंत्र्यदेवतेनी विचारलं.
"अगं हे मास्क आहे, याला नाकवर चढवं, तिकडे म्हणे स्वाईन फ्ल्यु नं थैमान घातलयं."
"हे काय बाई नवीन?"
"अगं तु आत्ता नाकाला लाव ते तिकडे गेल्यावर सगळं समजेलच. यंदा गणपती बाप्पा पण म्हणे मास्क लावुनचं येणार आहेत."
"मग असं असेल तर आपण सरळ मुंबईला जाऊ."
"अगं तिकडेपण हेच चित्र आहे. आणि तिकडे आपली काय गरज? यंदा तिकडे बरीच खास मंडळी आहेत."
"कोण गं?"
"आणि कोण?...तो अजमल कासब आणि मुंबई बॉम्बस्फोटातले तीन अतिरेकी. हो सरकारी पाहुणेच आहेत ते. आपल्या लेकरांनी प्राणांची आहुती देवुन आणलयं ना त्यांना. तेव्हा 'हिन्दुस्थानी पाहुणचार' तर हवाच ना."
"हो न्यायदेवतेनं सगळं सांगितलयं मला. हे पण आता त्या अफजल गुरु सारखी वर्षानुवर्षे फाशीची वाट बघत आराम करणार."
"अगं बाई, बोलत काय बसलोय आपण. म.न.पा.ला झेंडावंदन अटेंड करायचयं ना ७.३० वाजताचं?"
"हो हो चल निघुया."

दरवर्षीप्रमाणे यंदाही तितक्याच ऊत्साहाने प्रत्येक सिग्नलला झेंडे विक्रेत्यांची झुंबड उडाली होती. रस्त्यात ठिकठिकाणी गाड्या, दुकानांवर् लावलेले छोटे मोठे झेंडे पाहुन स्वातंत्र्यदेवतेचं ह्र्दय गर्वाने फ़ुलुन आलं होत.
पुणे स्टेशनहुन जाताना एका ठिकाणी बरीच लांब रांग दिसली. स्वातंत्र्यदेवतेला म्हंटल "हे बघ हे डाय-डु हॉस्पिटल. इथे स्वाईन फ्ल्यु ची तपासणी होते. त्यासाठी ही गर्दी."
"हम्म्म् सरकारी हॉस्पिटल दिसतयं"
"अगदी बरोबर..प्रायव्हेट हॉस्पिटल्सला तपासणीची सुविधा नाहीये ना"
"असं का गं?"
"अगं, क्रृत्रीम टंचाई निर्माण करुन सरकारी म्हणजे मंत्र्यांची तिजोऱी भरायचा चान्स नेहमी नेहमी थोडाच येतो?

तितक्यात म.न.पा. आलं. "अगं हे काय? अजुन कुणीच कसं नाही?"
"अगं महापौर आहे हेचं खुप झालं. ईतक्या सकाळी सकाळी कोण उठणार? त्यात आज शनिवार. जोडुन सुट्टी आल्याने नोकरदार वर्ग जाम खुश आहे. यंदा पाऊस तसा कमीच आहे, पण कदाचित वर्षाविहार करायला लोणावळ्याला गेली असावीत. सॉफ्ट्वेअरच्या लोकांमधे मात्र शनिवारी स्वातंत्र्यदिन आल्याने 'लॉंग वीकऎंड' जस्ट मिस झाल्याचा नाराजीचा सुर आहे. खरं तर मी तुला शाळेतलंच झेंडावंदन दाखवलं असत, पण स्वाईन फ्ल्यु मुळे यंदा शाळा पण बंद आहेत."
"आणि हि नेते मंडळी कुठं दिसली नाहीत. आहेतं कुठं?"
" बघ ईथला सगळा कारभार भरामातीच्या गवारांच्या हातात आहे. ईथले पालकमंत्री पण तेच आहेत. तिकडच्या खासदार कुप्रियाताईंचा पण एकडे बऱ्यापैकी दबदबा आहे. क्रृषीमंत्री श्री.परत गवारांची क्रृपा आणि काय."
"आणि ते कुठे आहेत?"
"हम्म्म...दिवसेंदिवस त्यांचा चेंडुफळी संघटनेमधे रस वाढतो आहे...तेव्हा ते तिकडेच असतात."
"आणि खासदार साहेब?"
"ईथले खासदार टुरेश मलकाडी....हे बऱ्याचदा दौऱ्यावर असतात."
"अच्छा....कॉमन्वेल्थ गेम्स नंतर बरीच वेल्थ कमावलेली दिसते."
"हो पण आपण कोण बोलणारे? हे सगळे लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत ईथले..'लहरी राजा अन् प्रजा आंधळी' अशी गत आहे बघ.."

आता आम्ही मोर्चा गावात वळवला. दुपारच्या वेळी सुध्दा आज रस्त्यावर रहदारी नव्हती. "ही सारी जनता काय स्वाईन फ्ल्यु च्या भितीने घरात दडुन बसलीये कि काय्?" स्वातंत्र्यदेवतेनी विचारलं.
नाही गं आजं रेडिओ आणि टी.व्ही.वर सगळ्या वाहिन्यांचे देशप्रेम ऊफाळुन आलयं. कुठे "आजादी का जशन्" तर् कुठे "मजे की आजादी" नावाखाली दिवसभर बॉर्डर, भगत सिंग, एल.ओ.सी, तिरंगा, क्रांतीवीर असे चित्रपट चालु असणार...संध्याकाळी हॉटेलात बघ कशी गर्दी होते ते."
"बिचाऱ्यान्ना तास तास वेटिंग मधे ऊभं रहाव लागतं म्हणे?"
"हो ना...मंदिरासारखा स्पेशल पास नाही मिळत ना ईथे"
"हो..त्याशिवाय सुट्टी कशी साजरी होणार यांची"

हळु हळु स्वातंत्र्यदेवतेच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत चालले होते...
"खरचं ईतकी मग्न झालीये का गं आपली लोकं आपापल्या आयुष्यात की त्यांना देशाबद्दल कुठल्याही गोष्टीत स्वारस्य नाही उरलयं. ईतकी हताश-हतबल. संपला का तो लढाऊ बाणा, ते सळसळत रक्त?"
"आजिबात नाही. रोज व्रृत्तपत्रातल्या भ्रष्टाचार, दहशतवाद आणि सामाजिक गुन्ह्यांच्या बातम्या वाचुन घराघरात चीड निर्माण होते, ठिणगी पेटते. दुर्दैवाने दैनंदिन व्यापात ती ठिणगी घरातच विझुन जाते. सामजिक गुन्हेगारी, भ्रष्ट राजनिती यांसारख्या व्रृत्तींचा नायनाट व्हायला उशीर आहे फक्त ही ठिणगी घराबाहेर पडण्याचा."
"पण या सगळ्या ठिणग्या एकत्र येवुन वणवा पेटणार तरी कधी?"
"त्यासाठी जनतेला वेळ हवा ना... महागाई, क्रृत्रीम टुटवडा, रहदारी, गर्दी, नोकरी यांसारख्या अनेक प्रश्नांनी त्यांना जखडुन ठेवलय. आठवड्यातुन एकच दिवस कुटुंबासाठी वेळ मिळतो तर समाजासाठी कुठुन वेळ काढणार? बिचारा बॉम्बस्फोट झाले तरी सकाळी ८.२० च्या ट्रेन ला हजर राहतो. आज वाचलो म्हणून दुसर्‍या दिवशी पुन्हा संध्याकाळी सुखरूप घरी येण्याची आशा धरून "बचेंगे तो और भी लढेंगे" म्हणून घराबाहेर पडतो. स्वतः चौकट न मोडता समाजात रंग दे बसंती, स्वदेस, वेन्सडे आणि डोंबिवली फास्ट सारखे नायक जन्मावे अशी अपेक्षा करतो."

एव्हाना आश्रुंनी स्वातंत्र्यदेवतेला दुःख द्यायचे नाही या माझ्या स्वताःच्याच निश्चयाला आता तडा गेला होता...स्वातंत्र्यदेवतेच्या देखील डोळ्यात अश्रु तरळले होते…

काहितरी चमत्कार होईल असा दिलासा मी तिला देत होते...पण नियतीपुढे मात्र दोघींचेही चालले नाही. आपल्या 'अभासी' अस्तित्वाचा शेवट जवळ आल्याची जाणीव तिलाही झाली होती. माझ्या पाठीवर शेवटचा हात फिरवुन, म्हटलं तर आपल्या, म्हटलं तर परक्या देशाकडुन खाली मान घालुन तिने पाठ फिरवली होती. आता कधी कुठे भेटणार हे जरी माहित नसलं तरी "लवकरच भेटु" असे विनंतीवजा आशावादी शब्द नकळत माझ्या तोंडातुन पडले.

रस्त्यावर कचरागत पडलेल्या त्या झेंड्यांकडे पहात स्वातंत्र्यदेवतेने मात्र परतीचा मार्ग धरला होता...कदाचित पुन्हा परत न येण्यासाठीच...

"पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका" अशी स्वातंत्र्यदेवतेची विनवणी लिहिण्याची वेळ कुसुमाग्रजांवर का आली असावी, याची आता मला जाणीव झाली होती…

वैतागवाडी

आत्तापर्यंत मी या ब्लॉगवरुन त्या ब्लॉगवर माकड-उड्या मारत बऱ्याच पोस्ट "पहिली पोस्ट" म्हणुन लिहिल्या आहेत, त्यामुळे इथे पहिली पोस्ट लिहिण्याचा उत्साह केव्हाच मावळला आहे.

सकाळपासुन माझ्या जुन्या ब्लॉगवर मराठी पोस्ट टाकण्यासाठी बरेच हातपाय मारल्यानंतर शेवटी कंटाळुन नविन ब्लॉग सुरु करत आहे.

तुर्तास डोके ठिकाणावर नसल्याने जास्त न बोलता नविन पोस्ट टाकत आहे. स्विकार असावा.

कळावे,
सचिन अ.जोशी

ता.क.
आणि हो सांगायचचं राहिलं 'गरमा-गरम" नाव का दिल ते... एकदम शाळकरी मुलाच्या "कारणे द्या" स्टाईलमधे कारणे देत आहे...
१. खर तर दुसरं काही नाव सुचत नव्हतं.
२. सकाळपासुन ढग आलेले असल्याने आज हवामान खुपच उष्ण होते. ऑफिसला पोहोचेपर्यंत घामाने चिंब भिजलो होतो.
३. त्यात कधी नव्हे ते ऑफिसमधे A.C.दिवसभर बंद होते. अजुन गरमी.
४. तीन दिवसाचा लॉंग वीकएंड घरी जाऊन आल्याने पाणी बदलमुळे (कि स्वाईन फ्ल्युमुळे?) सर्दी आणि अंग पण गरम होते.
५. त्या रेडिफ ब्लॉगने सकाळपासुन डोकं अजुनचं गरम केल होतं.