Tuesday, December 8, 2009

परुळेकरांची मुक्ताफळे

माझ्या सदर ब्लॉगपोस्टची पार्श्‍वभूमी जाणण्यासाठी लोकप्रभा मासिकच्या २७ नोव्हेंबरच्या अंकात राजू परुळेकर यांनी लिहिलेला हा लेख जरूर जरूर वाचा. लेख वाचण्यासाठी एथे क्‍लिक करा.

हा लेख वाचून राजू परुळेकरांना लिहिलेला ई-मेल इथे पोस्ट करत आहे.

नमस्कार,
नुकतीच तुमची २७ नोव्हेंबरच्या लोकप्रभेतील अल्केमिस्ट्री वाचनात आली. यात सचिनबद्दल कुठलाही द्वेष, तिरस्कार नसल्याचे जरी आपण म्हंटले असले तरी लेख वाचताना याची शंका येते. यातील काही ठळक मुद्दे मी या पत्राद्वारे मांडु इच्छितो.

प्रसारमाध्यमांनी सचिनच्या २० वर्षाच्या कारकिर्दीचा एवढा थाट का केला हे आपण पत्रकार असल्याने अत्यंत उत्तमपणे मांडले आहे. पण यापुढे जावुन आपण नुकत्याच सचिनवर महाराष्ट्रभर झालेल्या टिकेला प्रसारमाध्यम कशी जबाबदार आहेत हे लिहिणार अस वाटत असतानाच लेख अनपेक्षित वळण घेतो. अर्थात मी देखिल तुमच्यासारखाच क्रिकेटला धर्म आणि सचिनला देव मानणार्‍यातला नाही, पण तो श्रीमंत असल्याने जनता त्याला मानते असे साफ चुकीचे आहे. सचिनची खेळी पाहाताना तमाम जनता त्याच्या शैलीकडे डोळेझाक करुन त्याच्या संपत्तीला दाद देते हे अत्यंत हास्यास्पद विधान आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे सचिनबद्दल लिहिणारे आणि बोलणारे अनेक विचारवंत वैचारिक दिवाळखोर आहेत अस आपण म्हणलात. अस असेल तर लतादीदी, धीरूभाई, अब्दुल कलाम यांच्या आयुष्यावर देखील अनेकजनांनी लिखाण केले आहे. ते देखील दिवाळखोरच का? कारण या सर्वांनी देखील हिम्मतराव वाबिस्कर, अभय बंग आणि प्रकाश आमटे यांच्यासारखे उल्लेखनीय समाजकार्य केल्याचे कुणाच्याही स्मरणात नाही. सचिनने मानवजातीला कोणते वरदान दिले हे विचारणे म्हणजे विषय सोडून बोलणे झाले. या सर्वांची सचिनशी तुलना होऊच शकता नाही. कारण प्रत्येकाचे कार्यक्षेत्र वेगवेगळे आहे. जो तो आपापल्या क्षेत्रात श्रेष्ठ आहे. आणि थोड्याफार प्रमाणात का होईना सचिन देखील समाजकार्य करतो. सचिनच नव्हे तर अनेकजण आपापल्या परीने समाजकार्यात खारीचा वाटा उचलत असतो. ट्रॅफिक जॅम झालेल्या रस्त्यात हातातली काम सोडून हाफ पॅंट वर गाड्यांना रस्ता करून देणारा युवक आणि अंधाला रेल्वेचा पूल ओलांडून देणारा मुंबईकर आपण रोजच पाहतो.

इथे सचिनच्या प्रामाणिकपणे कर भरून कमावलेल्या श्रीमंती बद्दल केलेली चर्चा अनावश्यक वाटते. कारण सचिन काही इतरांसारखा सामान्य जनतेचे शोषण करुन श्रीमंत झालेल्यांपैकी नक्कीच नाही. सचिनने क्रिकेट आत्मसात करण्यासाठी घेतलेले कष्ट या लेखात सोयीस्करपणे दुर्लक्षित केले गेले आहेत. सचिनने स्वत:ने बोललेले एक वाक्य इथे नमूद करावेसे वाटते. "भेळपुरी खण्यापासून कैर्‍या तोडण्यापर्यंत सार्‍या आनंदावर पाणी सोडून आपली सारी इनर्जी क्रिकेट मधे ओतली म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो. आचरेकर सर मानगुटीवर बसून प्रॅक्टिस करायला लावायचे तेव्हा खूप वाईट वाटायाच. साधी भेळपुरी खाता येत नसेल तारा कसला अर्थ मोठा खेळाडू होण्यात अस वाटायच. पण आयुष्यात काहीतरी कमवण्यासाठी हजारो गोष्टी गमवाव्या लागतात."

आणि सचिनच्या कर्णधारपदाच्या अपयाशाची चर्चा जगभर कुठेच होत नसताना आपल्याच लेखात वाचायला मिळाली. स्मरण करून दिल्याबद्दल धन्यवाद. कदाचित अख्ख्या क्रिकेतजगतातील विक्रम आपल्या नावावर केलेल्या सचिनला देखील याचे स्मरण नसणार. एक गोष्ट मात्र खरी, की उंटावरून शेळ्या हाकणार्‍या सेनापतीपेक्षा कधीही छातीवर वार झेलणारा बलाढ्य योध्दच श्रेष्ठ, नाही का?

गांगुली बंगाली प्रसारमाध्यमणशी जाणीवपूर्वक संवाद साधतो म्हणून सचिनने देखील मराठी मीडियाला जवळ का करावे? सचिन कधीही प्रसिद्धीच्या मागे लागला नाही. त्याने घरी कधी कुठली पत्रकार परिषद बोलावल्याचे मला तरी आठवत नाही, मराठीही नाही अन इंग्रजी पण नाही. स्वत:ला आणि त्याच्या कुटुंबाला तो नेहमी प्रसारमाध्यमंपासून दूर ठेवतो.

नुकतेच सचिन न बोललेल्या वाक्याला विनाकारण प्रसिद्धी दिली गेली. या लेखातुन तुम्हीसुद्धा याला हातभार लावलात. "तु महाराष्ट्रीयन असल्याबदद्ल काय फिल करतो?" या प्रश्नाला सचिनने "नक्कीच मला महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे, पण मी प्रथम एक भारतीय आहे", एवढे आणि फक्त एवढेच उत्तर दिले होते, बाकी सगळा मीडिया मायलेजचा खेळ होता. मुंबईत कोणीही येऊ शकतो वगैरे तो कधीच बोलला नाही.

लता-दीदी सचिन यांसारखे यशाच्या उत्तुंग शिखर गाठण्याची क्षमता असलेले अनेकजण महाराष्ट्रात आहेत. फक्त एका मराठी माणसाची दुसर्‍या मराठी माणसाचे पाय खेचण्याची वृत्ती नडते आहे. मुंबई मराठी माणसांची आहे आणि ती रहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.

ता. क.: आणि हो, तुमच्यादेखील २० वर्षाच्या कारकिर्दिला माझा सलाम. (अडव्हान्स मधे)

एक पामार वाचक,
सचिन अ. जोशी
मुंबई