Monday, October 12, 2009

'राज'सभा

परवा शुक्रवारी दुपारी ऑफिसबाहेर मित्रांसोबत पॅसिव्ह स्मोक करत ऊभा होतो. शिवाजी पार्कला आलेले पोलीस छावणीचे रुप पाहुन एकाने मोठ्ठा कश मारत विचारले, "आज क्या पी.एम. की रॅली है क्या?" मी म्हंटल "नही रे.. आज राज ठाकरे आ रहा है. केरला से एक हजार पुलिस आयी है"
"लो.. आज फिर होगी बडे लोग बडी बाते" दुसरा कश.
"ना..ना..हि ईज डिफरंट मॅन, हि डोंट टॉक नॉनसेन्स" जास्त काही माहित नसताना मी ठासुन बोललो. पण अधिक (प्रांत) वादात न पडता त्याने विषय बदलला. त्याला राजचा अमराठी चा स्टॅंड आवडला नसावा असा अंदाज आला.
चुकिचं अस काहीच नव्हतं. प्रत्येकच मत प्रत्येकाच्या दृष्टीने बरोबर असते, अस माझ मत आहे. पण वाद न घालता विषय संपले की मला समोरच्याचा विजय झाल्यासारखं वाटतं. म्हणुन नेहमीच या विषयावर होणाऱ्या डिबेटसाठी सभेला जाउन तयारी करायच ठरवलं.

खरं तरं आजपर्यंत मी कधी कुठली प्रचारसभा बघितली नव्हती. लहानपणी प्रचार म्हणजे गल्लीतुन भोंगे लावुन फिरणाऱ्या गाड्यांतुन कमळ, पंजा, धनुष्य मिळते एवढच माहित होत. मग ते घेवुन खिशाला लावुन फिरण्यात खुप मोठेपणा वाटायचा. आज मात्र योग चांगलाच जुळुन आला होता. ऑफिस समोरच सभा असल्याने खास असं रस्ता वळवुन जाव लागणार नव्हतं. त्यात वीकएंड पण चालु झाला होता. शिवाय संध्याकाळी प्रोफेसर पांडेंचं रटाळ लेक्चर होत. हे प्रोफेसर कदाचित यु.पी.चे असणार. विचारलं तर सांगेन राज ठाकरेंच्या सभेला गेलो होतो, बघु काय म्हणतात ते.

सभा ७ वाजता आहे असं समजलं, पण मुद्दामच पुढे खुर्ची पकडायला जरा लवकर जाऊन बसलो. एकदम समोरचा ऍंगल मिळाला. अर्धा तास मस्त अभंग ऎकत गर्दिचं आणि स्टेजचं निरीक्षण करत बसलो. साडे सात वाजले तरी सर्व बाजुंनी गर्दीचे लोंढे धडकत होते. राज ठाकरे आणि शिवाजी महाराजांच्या घोषणांनी वातावरण दुमदुमलं होतं. मनसेचे पट्टेरी झेंडे सर्वत्र नाचत होते.

तितक्यात नाशिक ढोल च्या गजरात मनसेचे एक एक शिलेदार स्टेजवर येवु लागले. एक भारदस्त आवाज या सर्वांची ओळख करुन देत होता. यानंतर प्रत्येक उमेदवाराने आपापले मतप्रदर्शन केले. आम्हाला आपले मत 'दान' न करता, कर्जाच्या रुपाने द्या असं अवाहन त्यांनी जनतेला केलं. तितक्यात 'राज साहेब आले..' असं सांगुन त्या भारदस्त आवाजाने पुन्हा माईकचा ताबा घेतला. राजं साहेबांच आगमन होताच.. 'ओ राजे..' या गीताने सगळ्या गर्दीला पुन्हा एक नवा जोश दिला. प्रत्येक जण आदराने आपापल्या जागी उठुन उभा राहिला. तितक्याच आवेशाने राज साहेबांनी पण हात उंचावुन सर्वांना अभिवादन केले. पुन्हा घोषणांना उधाण आलं.

मग हार-सत्कार वगैरे झाल्यावर राज ठाकरेंनी आपली 'राज'वाणी सुरु केली. त्यांनी जेव्हा गर्दिला 'अफ़ाट' असे संबोधले तेव्हा मी सहज मागे नजर वळवली. हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी मुंबईकरांनी जागा मिळेल त्या ठिकाणी तोबा गर्दी केली होती. ही सगळी गर्दी खेचली होती फक्त एका व्यक्तीने त्याच्या विचाराने. सुरुवातीला त्यांनी प्रत्येक मराठी प्रसार माध्यमांचे (सगळ्या प्रचारसभांचे थेट प्रक्षेपण दाखवल्याबद्दल) आणि सुप्रीम कोर्टाचे (रेल्वे ईंजिन हे निवडणुक चिन्ह दिल्याबद्दल) आभार मानन्यात थोडा वेळ घातला. मग एक् दीर्घ पॉज् घेवुन 'आता ईंजिन स्टार्ट' असा डायलॉग मारला आणि सगळीकडे हश्या पिकला व टाळ्यांचा कडकडाट झाला.

मग त्यांनी जो दांडपट्टा सुरु केला तो तासभर चालुच होता. यातील मिनिटा-मिनिटाला मारलेल्या कोपरखळ्या त्यांच्या 'ठाकरी विनोदबुद्धी' ची प्रचिती देत होत्या. बोलताना कुठल्याही परिणामाची परवा नाही पण कुठलाही फालतुपणा नाही, बडेजावपणा नाही. नेतेमंडळींसारखा खादी कपड्याचा देखावा नाही. मोठी मोठी आश्वासने तर आजिबात नाही. मराठीच काय तर कुणालाही पटतील असे मंत्रमुग्ध करणारे विचार. खास करुन कुठलीही टिका बिनबुडाची नाही. समोर एका टेबलावर व्रुत्तपत्रांतील कात्रणे, मासिके आणि वार्षिक अहवाल यांसारखी पुरावे ठेवलेली. त्या दिवशी मला राज ठाकरेंचे विचार पटले म्हणण्यापेक्षा त्यांची शैली खुप भावली असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. हे सगळं पहात आणि ऐकत असताना सरांनी आम्हाला वर्गात दाखवलेल्या मर्टिन ल्युथर किंगच्या 'आय हॅव अ ड्रिम' भाषणाची आठवण झाली. ध्यासवेडेपणा काय असतो हे कळले.

खर तर काही वर्षापुर्वी राज ठाकरे हि व्यक्ती फक्त ऐकुन होतो. तो बाळ ठाकरेंचा मुलगा कि पुतण्या हे देखिल ठावुक नव्हते. पण आज या व्यक्तिने आपले स्वतःचे एक अस्तित्व निर्माण केले आहे ते देखिल स्व-बळावर, फक्त साडे तीन वर्षात. ध्यास एकच महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषेला भौतिक आणि सांस्क्रुतिक वैभव प्राप्त करुन देणे.

राज साहेब, सांस्क्रुतिक सम्रुध्दीचे शिखर गाठुन जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र बनविण्यास आणि परप्रांतियांचे वर्चस्व नेस्तनाबुत करण्यास आपणास माझ्या हार्दिक शुभेच्छा.

ता.क. २२ तारखेला राजसाहेबांचे अभिनंदन करणारी एक पोस्ट नक्की टाकेन.

Friday, October 2, 2009

गारवा विडंबन