Wednesday, November 11, 2009

गड गेला पण सिंह आला

परवाच्या मॅच मधे सचिन आऊट झाला अन करोडो चाहत्यांचा काळजचा ठोका चुकला. आपल्या कारकीर्दितली अजुन एक अविस्मरणीय खेळी करुन सचिनने आपले अस्तित्व तर दाखवुनच दिले पण टिकाकारांच्या कानाखाली जबर चपराक देखील दिली. अर्थात भारत तो सामना हरला आणि काल तर मालिका पण गमावली. गड गेला खरे, पण सिंह आला हे नक्की. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पण असेच काही घडले. एकीकडे मराठी माणुस युतीच्या हातुन सत्तेचा गड गेल्याची हळहळ व्यक्त करत आहे तर दुसरीकडे राज ठाकरे नावचा सिंह विधानसभेत आल्याचा आनंद व्यक्त करत आहे. महाराष्ट्रातील मतदारची अशी दुविधा मनस्थिती प्रथमच झाली असावी.

युतीच्या, मुख्यतः शिवसेनेच्या पराभवाची कारणे शोधायचंच झाल तर एक ना अनेक कारणे पुढे येतील. पहिलं म्हणजे मतदारांचा भावनिक द्रुष्टीकोन. मतदारांच्या मानसिकतेच विश्लेषण केलं तर असं समजतं भाजीपाला देखील पारखुन घेणारा भारतीय मतदार, उमेदवार निवडताना आजही कॉंग्रेसला फक्त गांधी घराण्याच्या नावावर मते देतो. तसेच बहुतांश मतदार हा अपरिपक्व आणि असमंजस आहे. पी.व्ही. नरसिंहराव यांनी जेव्हा भारतीय उद्योगक्षेत्र आणि अर्थव्यवस्थेत लाक्षणिक बदल घडवले तेव्ह्या त्यांना जनतेने पायउतार केले. चंद्राबाबु नायडुंच्या बाबतीत देखील आंध्रात असेच घडले. याउलट अटलजींनी जेव्हा 'मंदिर वही बनाएंगे' अशी घोषणा दिली, तेव्हा जनतेने त्यांना सत्तास्थानी नेउन बसवले. मात्र सत्तेत असताना भाजपाने जनविकासाचे असंख्य प्रकल्प राबवुनही, जनतेने त्यांना परतीची वाट दाखवली. शिवसेनेने यावेळी आपल्या प्रचारसभांतुन महाराष्ट्राच्या शेतकरी वर्गाच्या दुर्दशेकडे लक्ष वेधले. उध्दव ठाकरेंनी अख्खा महाराष्ट्र पिंजुन काढला. पण जनतेने आपला कौल पुन्हा आघाडीकडेच दर्शवला. पाणी-वीजटंचाई, आत्महत्या, महागाई या समस्या भोगुनसुद्धा जनतेने पुन्हा त्याच निष्कर्त्या सरकारला निवडुन दिले. थोडक्यात काय, तर ईथल्या मतदारांना विकासकामांशी कसलेही देणे घेणे नाही.

दुसरे कारण म्हणजे सगळी जनता आणि स्वतः शिवसेना ज्याला दोष देतायेत ती मनसे. फक्त साडेतीन वर्षात आपले अस्तित्व प्रस्थापित करुन भरघोस मताधिक्याने मनसेचे उमेदवार निवडुन आले खरे, पण मराठी मतांच विभाजन झाल्यानेच युतीचे महाराष्ट्रभर तीन 'तेरा' वाजले हे वादातीत सत्य आहे.

तिसरे आणि प्रमुख कारण म्हणजे स्वतः शिवसेना. हे वाचल्यावर "कोण रे तु घोंचु, साला कारणमीमांसा करणारा?" या आणि याहुनही शिवराळ भाषेत मला सेनेच्या प्रतिक्रिया मिळतील. ते खरदेखील आहे म्हणा, राजकीय पराभवाची कारणमीमांसा म्हणजे भारतीय हवामानखात्याच्या दर पावसागणिक 'अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा' हे कारण सांगण्याइतके सोपे नाही. पण जसा तुम्ही ४४ वर्षे मराठी जनांची सेवा केल्याचा हिशेब देता, तसा मी देखिल एका शिवसैनिकाच्या हक्काने (आजी असो की माजी) "तुम्ही कोण एका आमच्या भावनांना आवर घालणारे?" असा प्रतिप्रश्न करु शकतो.

शिवसेनेच्या इतिहासातील चढउतार बघता ही हार म्हणजे "युतीची दुर्गती" होते आहे हे स्पष्ट जाणवते. पण याची कारणमीमांसा करण्याची तसदी न घेताच सेना पराभवाचे खापर मराठी माणुस आणि तरुणवर्गावर फोडुन मोकळी झाली. आणि वर पुन्हा आम्ही अस बोललोच नव्हतो अस म्हणुन मोकळे. हा... काही अंशी हे खरही आहे, कारण सामनाचा संपादकीय लेख हा त्या रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुल्यांच्या खेळासारखा आहे. चेहरा एकाच अन बोलणारा दुसरा. पण हे लक्षात आल्यावरही "भावनेच्या भरात व मराठी जनांवरील आपल्या हक्कापोटी जे काही बोललो त्याबद्दल माफी मागत आहे", असं सांगितल असत तर आम्हा मराठी जनतेला तुमचा अभिमानच वाटला असता. अर्थात आपल्यासारख्या आदरणीय व्यक्तिची माफी कोणी स्विकारली असती म्हणा.

मान्य केले या निवडणुकीत उमेदवारीचे काही निर्णय चुकले, चुकीचे 'आदेश' दिले गेले. पण शिवसेना याच्या बऱ्याच आधी कुठेतरी चुकत होती. आजतागायत शिवसेनेत अनेक बलाढ्य नेत्यांची या न त्या कारणाने उलाढाल झाली आहे, काहींची तर हाकलपट्टीदेखील झालीये. खरं तर तेव्हाच धोक्याची घंटा ओळखायला हवी होती. कुठेतरी पाणी मुरतयं याचा अंदाज यायला हवा होता. सेना ही आता बलाढ्य लोकप्रतिनिधींचा 'लॉंच पॅड' ठरु लागली आहे. (ईथे बलाढ्य म्हणजे जास्तीत जास्त मतदारसंघ व आमदार ताब्यात असलेला नेता. पण असल्या पळकुट्या नेत्यांची लायकी तुम्ही-आम्ही जाणुनच आहात.) ईथुन लॉंच झालेले नेते पक्ष बदलुन दुसऱ्या पक्षात उडु लागली आहेत. पक्षांतर्गत तंटे उखडुन याला वेळीच आवर घातला नाही तर याचा अजुन जबर फटका सेनेला बसल्याशिवाय राहणार नाही. अर्थात परवाच सामना संपादकाने म्हंटल्याप्रमाणे सेना ही अस्वला सारखी आहे, १-२ केस गळाल्यानी तुम्हाला काही फरक पडत नाही. पण महाराष्ट्राला पडतो ना फरक. ज्या राज ठाकरेंवर आपण आपल्या पराभवाचा ठपका ठेवत आहात त्यांनी तर फक्त १३च जागा पटकावल्या आहेत. त्याआधीच्या पक्षाच्या गळालेल्या केसांनी तर सेनेला टक्कल पडायची नामुष्की आणलीये. आज जर तुम्ही राज ठाकरेंना दोषी धरत असाल तर २००४ साली कुठे होता हा पक्ष? तेव्हाही पड खाल्लीच ना? राजला दुय्यम वागणुक देवुन त्यांचा पत्ता तुम्ही कट केला खरे, पण आपल्या वारसाचा एक सरस दावेदार गमावुन बसलात. त्यात राजने आपली ताकत दाखवुन मीच खरा वारसदार हे सिद्ध केले तर त्यात वावगे काय आहे?

आज शिवसैनिक, जो मोर्चे काढतो, घोषणा देतो, लाठ्या खातो आणि प्रसंगी जेलमधेही जातो, तो भरकटलेल्या स्थितीत आहे. त्यांना नेता हा ठाकरेच हवा आहे, पण राज कि उद्धव? सेना कि मनसेना? असा संभ्रम त्याला सतावत आहे. अगदी मनोहर जोशी, बाळा नांदगावकरांपासुन ते सामान्य नागरीक अप्रत्यक्ष का होईना सेना-मनेसेना एकीची आशा धरुन आहेत. पण 'हु विल ब्लिंक फ़र्स्ट' असा खेळ चालु आहे.

पुराणात एक कथा आहे. भारत हे आपल्या देशाचे नाव ज्या राजावरुन पडले, त्या भरत राजाची ही गोष्ट आहे. आपल्या निव्रुत्तीच्या समयी भरत राजा आपल्या मातोश्री शकुंतलेकडे गेला आणि म्हणाला, "माते, माझ्या आठ पुत्रांपैकी केवळ 'माझा पुत्र' म्हणुन राजगादीवर बसवावा असा कोणीही लायक नाही. मला मार्ग दाखवं" शकुंतला माता म्हणाली, "राजा हा कुटुंबदक्ष असण्यापेक्षा प्रजादक्ष असला पाहिजे. जा राजसभा भरव आणि जनतेलाच आपला राजा निवडु दे."
सभा भरली. भरताने आपल्या आठही पुत्रांची परिक्षा घेतली होती त्यात एकही पात्र ठरला नाही असे भर सभेत जाहीर केले. मग जनतेने भरताच्या अष्टप्रधानांपैकी एकाचा मुलगा शंतनु याला आपला राजा म्हणुन निवडले. शेवटी भरतराजाचा अनुवंश गादीवर बसला नाही.

पुरानातील ही प्रथा आजच्या लोकशाहीतही तितकीच वैध आहे याची प्रचिती जनतेने निवडणुकांतुन दाखवुनच दिली आहे. राज कि उध्दव या प्रश्नाचे उत्तर वेळोवेळी निवडणुकांतुन मिळतच राहील पण अजुनही वेळ गेलेली नाहिये. कुणीतरी कुठेतरी समेळ घडवुन आणणे महाराष्ट्र हितासाठी आवश्यक आहे. नाहीतर पुढची विधानसभा निवडणुक होईल तेव्हा शिवसेना ४९ वर्षाची झाली असेल आणि सचिन तेंडुलकर सतरा वेळा नव्वदीत बाद झाल्याचं नाही वाटलं ईतक दुःख शिवसेना फिफ्टी न मारताच 'आउट' झाल्याचं वाटेल.

1 comments:

Girish said...

Excellent sachin...I fully agree with you...
But you are more emphasizing on political issues..I guess its not our cup of tea....

Post a Comment