Wednesday, November 3, 2010

आठवणीतली दिवाळी

शाळेत असताना १८५७ च्या उठावाची कारणे आणि भुमितीची प्रमेय घोकत असताना नाकात येणारा खमंग चकलीचा वास दिवाळीची चाहुल द्यायचा. मग कधी एकदाची सहामाही संपते अन कधी फटाके घेतो अस व्हायचं. शेवटच्या पेपरला मग आईच्या ‘कोणत्या प्रश्नाचे काय उत्तर लिहिले?’ या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन गल्लीतल्या पोरांबरोबर चौकात धुम ठोकायचो. कोण किती फटाके उडवणार, कोणाकडे कुठल्या आकराचा आकाशकंदिल असणार हि दिवाळीपुर्वीची तयारी करण्यात मग मनं हरपुन जायचं.

नरकचतुर्दशीच्या दिवशी भल्या पहाटे घरातील मोठी मंडळी पोरांच्या अंगावरील गोधड्या काढून टाकत. थंडी अंगाला झोंबु लागली की कधी एकदाचा गरम पाणी अंगावर घेतो असं होई. पण आधी मोठ्या मंडळींचा आंघोळीचा राऊंड होई, तोपर्यंत आम्ही पहिल्या आंघोळीचे फटाके उडवत असू. बाहेरच्या मिट्ट काळोखात चुल किंवा बंबातले लाल निखारे बघत दात घासताना, गावातल्या सांस्क्रुतिक मंडळाने लावलेली भजनं अन् प्रभात गीते मनात चैतन्य निर्माण करी. आमच्या आंघोळी सुरु होईपर्यंत सगळं घर सुगंधी तेल व उटण्याच्या वासने दरवळुन जाई. मग आई, ताई, आजीच्या थंड हाताने तेल-उटणे लावताना अंग अजुनच कुडकुडून जाई. आंघोळ आटोपल्यावर मग फराळाचे वेध लागत. एकदा का फराळ फस्त केला की मग आम्ही बच्चे मंडळी हुंदडायला मोकळी. मग संध्याकाळी नवीन कपडे घालुन आम्ही आजोबांकडुन आपआपल्या वाटेची फटाके घेत असु. ‘फटाके अंगापासुन दुर ठेवा’, 'गायींपासुन दुर फटाके फोडा रे…’ या सुचनांसहित फटाके वाटप होत असे.

मी झोपण्यापुर्वी एकदा गल्लीतल्या सर्व पणत्या अन आकाशकंदिल पुनःपुन्हा डोळ्यात अन् फटाक्यांचे आवाज कानात साठवुन घेत असे. आम्ही सगळी भावंड कडकडत्या थंडीत अंगावर गोधड्या ओढुन 'आता पुन्हा पुढच्या वर्षीच ही आनंदाची दिवाळी येणार' अशा विचारात झोपुन जात असु.

कित्येक वर्ष ही आठवणीतली ही दिवाळी मी मनात घट्ट पकडुन ठेवली आहे. पण पुर्वी दिवाळीत मिळणारा शेव-चिवडा हल्ली हल्दीरामच्या पॅकेट्सद्वारे लोकलच्या प्रवासातला टाईमपास झाला आहे. चकली-लाडु फुड-मॉलमधे बारमही मिळु लागले. वाढदिवसाला पंचपक्वान्न करणं देखील रीत झाली. लग्न-निवडणुकांच्या आतषबाजीने फटाके म्हणजे दिवाळी हे समीकरण बदलुन टाकलं. ऑफिसला जाण्यापुर्वी फसफसुन मारलेल्या पर्फ्युम्सनं सुगंधी तेलं-उटण्याचं नाविन्य कमी केलं. अन् ट्रेंडी कपड्यांच्या नियमीत शॉपिंगने दिवाळीच्या नव्या कपड्यांची नवलाई संपुष्टात आणली. कालाय तस्मै नम:!

जुनं काही बदललं म्हणुन ही तक्रार नाही. वेगानं बदलत असलेल्या या नव्या जगाचे नक्कीच स्वागत आहे. पण हे बदल होताना मुळचा उत्साह निखळपणा अन् निर्व्याज आनंददेखील संपुष्टात येतोय की काय याची चाहुल अस्वस्थ करते. त्यामुळे जसं जसं वय वाढत गेलं आणि घरापासुन दुर गेलो, तसतशी ती बालपणीची दिवाळी आठवणीत आणखी रुतत गेली. दिवाळीच्या वातावरणात घरापासुन दुर असलं की ती आठवणीतली दिवाळी जागी होते.

तुम्हा सर्वांना आपआपल्या आठवणीतल्या दिवाळीच्या मनापासुन शुभेच्छा

1 comments:

Marathi Greetings said...

फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment